पुणे - मित्र-मैत्रिणींसोबत ट्रेकिंगला आलेल्या मित्राला पाय मोडलेल्या अवस्थेत मित्रांनी जंगलातच सोडल्याची घटना समोर आली आहे. प्रवीण ढोकळे हा तरुण राजमाची येथील घनदाट जंगलात मित्र-मैत्रिणींसोबत ट्रेकिंगला गेला होता. तिथे प्रवीणचा पाय फ्रॅक्चर झाला, अशा परिस्थितीत त्याचे मित्र त्याला तिथेच सोडून गेले.
काही मित्रांनी ही घटना लोणावळ्यातील शिवदुर्ग टीमच्या कानावर घातली. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या टीमने जीवाची बाजी लावून तब्बल चार तासांचे कठोर परिश्रम घेत प्रवीणला जीवदान दिले. तोपर्यंत जखमी प्रवीणचे मित्र आपापल्या घरी निघून गेले होते. त्यांनी आपल्या मित्राला संकटात मदत न करता तेथून काढता पाय घेतला.
हेही वाचा - पिरंगुटजवळ ट्रकचालकाने दुचाकीस्वारांना चिरडले; तिघांचा जागीच मृ्त्यू
दरम्यान, १०३ किलो वजन असलेल्या प्रवीणला अगोदर खांद्यावर हात ठेवून चालण्यास सांगितले. मात्र, त्याला जास्त वेदना होत असल्याने अखेर स्ट्रेचरवर झोपवून शिवदुर्ग टीमने त्याला सुखरूप मुख्य रस्त्यावर आणले.