पुणे - राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. गेल्या महिन्याभरापासून शिवाजीराव आढळराव पाटील दिवस रात्र मतदारसंघात पूर्ण वेळ आपली भूमिका मांडत होते. मात्र, निवडणुकीची दंगल संपल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांनी थेट मुंबई गाठत आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. त्यांनी आपल्या कुटुंबासोबत श्रीलंकीयन हॉटेलमध्ये जेवण केल्याचे पाहायला मिळाले. तसेच आढळराव पाटील हे आपल्या नातवंडामध्ये रमलेले दिसून आले.
गेल्या महिन्याभरापासून कुटुंबातील प्रत्येक सदस्य शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काम करत होता. मात्र, प्रचारामुळे एकमेकांना वेळ देता आला नाही. 29 तारखेला मतदान झाल्यानंतर आढळराव पाटलांनी 30 तारखेला थेट मुंबई गाठली. आढळराव पाटील हे कुटुंबातील नातवंडांबरोबर सेल्फी काढत, झोका घेत गप्पा गोष्टी करत असल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक काळात नातवंडांना वेळ देऊ शकले नव्हते. त्यामुळे घराला घरपण देणारी चिमुकली मुले आजोबांबरोबर खेळत असताना संपूर्ण कुटुंबाला एक वेगळाच आनंद झाला होता.