पुणे - कोरोना महामारीच्या संकटकाळात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडयावरून राजकीय नेत्यांचे वादविवाद विकोपाला जात आहेत. या दरम्यानच अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आल्याने शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील सरकारच्याच निर्णयाविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
शिवाजी आढळराव पाटील यांनी केले ट्विट -
शिवाजी आढळराव पाटलांनी याबाबत एक ट्विट केले आहे. राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात आले. त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे. अभिमन्यू काळे यांना मी अतिशय जवळून ओळखतो राजकिय हितापेक्षा लोकहित नजरेसमोर ठेवून त्यांनी नेहमीच आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला समोर जावे लागले आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीला माझा ठाम विरोध असून जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्याला माझा जाहीर पाठिंबा आहे, असे शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.