पुणे - चाकण औद्योगिक वसाहत, खेड सेझ या परिसरात राज्य परराज्यातील कामगारांची संख्या लक्षात घेता पुणे जिल्ह्यात सर्वाधिक धोका असणारा तालुका म्हणुन खेडकडे पाहिले जात होते. मात्र, या परिस्थितीत कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी खेड तहसिलदार, पोलीस, आरोग्य विभाग, पंचायत समिती, सामाजिक संस्था तसेच विविध कंपन्यांच्या मोठ्या योगदानातून कोरोनावर मात करण्याची लढाई यशस्वी लढली जात आहे. या परिसरात आत्तापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नाही, हे प्रशासनाचे यश असल्याचे मत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी झालेल्या प्रशासनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
चाकण औद्योगिक वसाहतीतील ६ ग्रामपंचायत क्षेत्रात अडीच लाखांपेक्षा जास्त कामगार वास्तव्यास आहे. हे सर्व कामगार तात्पुरत्या स्वरूपावर काम करत आहेत. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कामगारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून या संकटाचा सामना केला. यामध्ये अनेक सामाजिक संस्था, ग्रामपंचायत, दानशूर व्यक्ती, कंपन्या आणि प्रशासनाने मिळून या कामगारांना जेवणाची रहाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या परिसरातील एकही कामगार उपाशी पोटी झोपू नये, यासाठी प्रशासनाकडून मेहनत घेण्यात आली. त्याच मेहनतीला आज यश मिळताना दिसत असल्याचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.
आजपर्यत चाकण खेड आळंदी या परिसरात अद्यापपर्यंत एक कोरोना रुग्ण आढळून आला नाही. ही परिस्थिती कायम राहिली तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुका लवकरच लॉकडाऊनमधून बाहेर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.