पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी संबधीत आरोपीवर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन देखील देण्यात आले. तसेच आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया नाना भानगिरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर : यावेळी नाना भानगिरे म्हणाले की, मागील अकरा महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात विकास कामांचा धडका लावला आहे. पण त्याच दरम्यान सोशल मीडियावर एका व्यक्तीनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला आहे. त्या व्यक्ती विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई करण्यासाठी आज आम्ही आंदोलन करीत आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेऊन त्वरित गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घ्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा समाजात चुकीच्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहे. हे आम्ही कधीच खपून घेणार नाही. लवकरात लवकर या गोष्टी थांबल्या नाही, तर आम्ही जशाच तस उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी विरोधकांना त्यांनी दिला.
विरोधकांच्यात पोटशूळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सध्या सोशल मीडियावरती ट्रोल केल्या जात आहे. या ट्रोलवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांना या संदर्भात एक निवेदन दिले असून, लवकरच सायबरमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले आहे. अभय नावाच्या फेसबुक अकाउंटवरून बदनामी करण्यात आली आल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही बदनामी यापुढे सहन करणार नाही विरोधकांच्या पोटात पोटसुळ उठत असल्याने हजार दोन हजार रुपये देऊन काही तरुणांना हे काम करायला लावण्यात आल्याचा आरोप नाना भानगिरे यांनी केले आहे.