पुणे- राज्याला सध्या एक मुख्यमंत्री नाही तर 3 मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे बैठका घेत आहेत. तर अजित पवार मंत्रालयात येऊन बैठका घेत आहेत. तर सुपर मुख्यमंत्री हे दौरे करत आहेत, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर केली.
मराठा आरक्षणाबाबत आज सुनावणी होत आहे. या सुनावणीवर बोलताना मेटे यांनी सरकारवर टीका केली. सरकार मराठा आरक्षणाला गंभीरपणे घेत नाही. आजचा विषय हा जीवन मरणाचा विषय आहे. आमच्या मुलांच्या भवितव्याचा विषय आहे. आजची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होऊ नये ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. हा विषय घटनात्मक विषय असल्याने घटना पीठाकडेच ही सुनावणी झाली पाहिजे. ही साधारण सुनावणी नाही हे सर्वसामान्यला कळत असेल तर या सरकारला का कळत नाही. आम्ही आरक्षणाबाबत हस्तक्षेप याचिका दाखल केली असल्याचे मेटे यांनी सांगितले.
स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती...
सामन्याच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीची स्टेअरिंग माझ्या हाती आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जो फोटो वापरला त्यात स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती असल्याचे दिसते. या फोटोतून कोणाता संदेश तर दिला जात नाहीत ना, असा सवालही मेटे यांनी केला.