पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपु्र्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनचा प्रतिकूल परिणाम गरीब, मजूर, स्थलांतरित कामगार, बाहेरगावचे विद्यार्थी यांच्यावर पडला आहे. त्यामुळे सरकारच्या निर्देशानुसार राजगुरूनगर येथे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात शिवभोजन थाळीच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे भुकेलेल्या नागरिकांनी उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत जेवणासाठी रांग लागली होती.
हेही वाचा... लॉकडाऊन : चिमूर शहरात शिवभोजन योजनेस प्रारंभ; पाच रुपयात मिळणार जेवण
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब, मजूर व विद्यार्थ्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरु केला आहे. लॉकडाऊनच्या काळात या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना पाच रुपयात भोजन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
राजगुरुनगर येथे सुरु करण्यात आलेल्या या शिवभोजन केंद्रावर प्रायोगिक तत्वावर दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात शंभर थाळींचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच आज पहिल्याच दिवशी स्थानिक बजरंग दलाकडून शंभर थाळींचे पैसे केंद्रात जमा करण्यात आले. त्यामुळे या शिवभोजनाला येणाऱ्या लोकांना आज मोफतच जेवण मिळणार आहे. तसेच या लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजू कुटुंबांना बजरंग दलाकडुन मोफत घरपोच जेवण देण्याचे काम सुरु आहे.ो