पुणे - शिरुर आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष्य लागले आहे. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी पोलीस व प्रशासन सज्ज झाले असून सैन्यदलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
मावळ, शिरुर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मशीन बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून बालेवाडी येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य २९ एप्रिलला मशीनमध्ये बंद झाले आहे.
ईव्हीएम मशीनमुळे संशयाच्या वातावरणाची चर्चा सर्वत्र केली जात आहे. पोलिसांकडून ३ लेयरची सुरक्षा असून ५०० पेक्षाही जास्त पोलीस तैनात आहेत. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नसल्याचे पोलीस अधिकारी सांगत आहेत.
पवार घराण्यातील उमेदवार असल्याने मावळमध्ये पवार कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, शिवसेनेचे श्रीरंग बारणे हॅटट्रिक करत मावळवर शिवसेनेचा भगवा फडकावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिरुरमध्ये शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आढळराव चौकार मारतात की राष्ट्रवादीचे उमेदवार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे आढळरावांना ‘क्लिन’ बोल्ड करतात, ही चर्चा शिरुर मतदार संघात रंगली आहे. शिरुर व मावळ मतदार संघात व्हीव्हीपॅटमुळे रात्री उशिरापर्यंत निकाल लगण्याची शक्यता असून लोक मात्र निकलाची वाट सकाळपासून पाहत आहेत.