पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीबाबत आपले मतभेद असतील. मात्र, आरएसएसचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने लोकांना भेटण्याचे संपर्क अभियान राबवतात, तशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहचा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्ववभूमीवर भोसरी येथे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभेतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी पवार बोलत होते.
आत्तापासूनच घरोघरी जाऊन लोकांना भेटायला हवे. हे काम केले तर, ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत. आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले, अन एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. संध्याकाळी घर बंद असेल तर सकाळी त्या घरी जाऊनच येतात, असे सांगत आरएसएसकडून चिकाटी शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले.
पंतप्रधान गुहेत जाऊन बसतात-
यावेळी बोलताना पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. सध्याच्या सरकारमध्ये वाढत असलेल्या धार्मिकतेवर त्यांनी टीका केली. संबंध देशाने पाहिले की देशाचे पंतप्रधान एका गुहेत जाऊन बसले होते. भगवे कपडे घालून ते सकाळ पासून संध्याकाळपर्यंत गुहेत जाऊन बसले. नव्या पिढीसमोर काय आदर्श ठेवत आहात. जग कुठे चाललेय? आधुनिकता आणि विज्ञान काय सांगतात? हे सोडून पंतप्रधान गुहेत जाऊन बसतात, अशी टीका पवारांनी केली.
गुन्हेगार शिष्याची भेट घेणाऱ्या खासदार साक्षी महाराज यांच्यावरही त्यांनी टीका केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात बैठक व्यवस्थेवरून निर्माण झालेल्या वादावर पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. काहीतरी गैरसमज झाला असेल. हा मुद्दा वादाचा नाही, असे पवार म्हणाले.