पुणे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकर्यांना संबोधित करण्यासाठी उठले असताना त्यांचा सत्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कारावर माझ्या हातात पुष्पगुछ देऊन मला निवृत्त करण्याचा यांचा विचार दिसतोय, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली. तसेच अनेकांना वाटले होते मी निवृत्त होईल. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने तसे घडू दिले नाही, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.
कृषिक २०२० या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीत झाले. यावेळी शरद पवार बोलत होते. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने शेती अतिशय महत्वाचे क्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे. या क्षेत्रात काम करणारा सर्व सेवकवर्ग आणि त्यांना साथ देणारे सरकार चांगले काम करत आहे. जगात शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक बदल घडत आहेत, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा - सीएए, एनआरसी विरोधात मुस्लिम महिलांचे चोवीस तास ठिय्या आंदोलन
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ होत असून लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे काम शेतीमुळे शक्य होत आहे. मात्र, त्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. शेतीत घाम गाळणार्या शेतकर्यांच्या दारात संशोधन गेले पाहिजे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा घातल्याने शेती संशोधनावर मर्यादा आल्या आहेत. खरेतर जे उपयोगी आणि फायदेशीर आहे, त्याला विरोध होणे अपेक्षित नाही. तसेच न्यायालयाच्या या निर्णयावर मी काहीच भाष्य करणार नाही. मात्र, जे सर्वांसाठी हानिकारक आहे त्याला विरोध करा. त्यास माझी मान्यता आहे, असे पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, पशू संवर्धनमंत्री सुनील केदार, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, अभिनेता आमिर खान, आमदार रोहित पवार, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह मोठ्या संख्यने शेतकरी वर्ग उपस्थित होता.
हेही वाचा - अपघातग्रस्त वाहन चौकात ठेऊन नागरिकांना वाहतूक पोलिसांचे मौल्यवान मार्गदर्शन