पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तर या पहाटेच्या शपथ विधीवर मी बोलणार नाही असे वक्तव्य केले आहे. अश्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर विधान केल आहे. ते म्हणाले की पहाटेची शपथविधी झाली नसती तर राष्ट्रपती राजवट उठली नसती. आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले नसते. असे यावेळी पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले : चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार यांना पहाटेच्या शपथ विधीबाबत विचारले असता ते म्हणाले की सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राज्यात जी राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडले ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे. राज्यात तेव्हा तसे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असे शरद पवार यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात काहीही झाले की पवारांचे नाव : यावेळी फडणवीस यांनी जे विधान केले त्यावर पवार म्हणाले की महाराष्ट्रात काहीही झाले की एका व्यक्तीचे नाव येते. हे आपल्या राज्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. लातूरला भूकंप झाला त्याला कारणी भूत देखील मीच होतो. असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीचा करत या सगळ्याची बोलणी थेट शरद पवारांशी झाली होती. त्यांना आम्ही शपथ घेणार हे माहित होते. असे वक्तव्य केले होते. यानंतर शरद पवारांनी मात्र देवेंद्र फडणवीस हे असत्याची बाजू घेत बोलत असल्याचे म्हटले आहे. असे त्यांनी आत्ता म्हटले आहे. पण राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम असून मी यावर बोलणार नाही असे सांगितले आहे.