पुणे - संभाजी ब्रिगेडच्या पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात शरद पवार यांनी संभाजी ब्रिगेडने आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. आता आरक्षण-आरक्षण बस झालं. जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही, तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही असे विधान शरद पवारांनी केले होते. यानंतर मराठा समजाच्या काही संघटनांकडून पावर यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
शरद पवार आरक्षण विरोधी - मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून शरद पवारांची ही राजकीय चाल आहे. शरद पवार कालही आरक्षण विरोधी होते आजही आरक्षण विरोधी आहे, उद्या सुद्धा आरक्षण विरोधी राहतील. आरक्षणच संपलं पाहिजे, रद्द झालं पाहिजे. पण सुप्रिया सुळे धनगर समाजाच्या जीवावर निवडून येतात. मात्र, धनगर समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही हीच पवारांची भूमिका असावी अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे.
आरक्षण विरोधी आरएसएसचा कट- आरक्षण विरोधी आरएसएसचा कट शरद पवारांनी मान्य केला असावा. 45 मराठा बांधवांनी मराठा समाजासाठी स्वतःचे प्राण दिले. हे पवारांना दिसत नाही का? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
SEBC आरक्षण फसवे - मराठा समाजाला SEBC प्रवर्गातुन आरक्षण देऊ नये हे आरक्षण कायद्याने टिकणार नाही हे संभाजी ब्रिगेड ने वारंवार स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने घटनात्मक पध्दतीने स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या समितीने मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण घटनात्मक आहे. 'मराठा-कुणबी व कुणबी-मराठा एकच असून हा समाज सामाजिक, आर्थिक दृष्टया मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून त्यांना आरक्षण दिले पाहिजे. असे मागासवर्ग आयोगाने राज्य व केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.
मराठा समाज आरक्षणापासून उपेक्षित - राजकिय इच्छाशक्ती नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून उपेक्षित ठेवले जात आहे. त्यामुळे नोकरभरती थांबली आहे. प्रमोशन रखडले व विद्यार्थी महाविद्यालयीन व इतर प्रवेशापासून बंचित ठेवले गेले आहे. हा सत्ताधारी व विरोधीपक्षाचा गेम प्लान आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेड ने केला आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेले आरक्षण देखील मराठा समाजाला उपयोगाचे नाही, त्यामुळे फक्त ओबीसी मधून आरक्षण आवश्यक आहे. मात्र, असे आरक्षण देण्यास प्रस्थापित राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती नाही हा संघर्षात्मक आंदोलन करणा-या व आरक्षणासाठी स्वतःचा प्राण देण्या-या प्रत्येक आंदोलकांचा ठरवून केलेला खुन आहे असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.