बारामती (पुणे): काल देखील शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. त्या पत्रकार परिषदेला अजित पवार का उपस्थित नव्हते, अशीही चर्चा प्रसारमाध्यमांनी सुरू केली; पण आज जेव्हा शरद पवार त्यांच्या निवासस्थानी म्हणजे गोविंद बागेत आले, तेव्हा मात्र त्यांनी पत्रकारांच्या याच प्रश्नाला फटकारलं आणि त्यांनी विनंती केली.. 'कृपया अजित पवारांच्या बाबतीत चुकीची वृत्त पसरवू नका.'
कार्यक्रमांची दिली माहिती: काल अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले आणि दिल्लीवरून परत आले अशीही चर्चा सुरू होती; मात्र रात्री अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकच थेट प्रसार माध्यमांच्या कार्यालयांना पाठवले. आपण आज मुंबईतच आहोत, उद्या दौंडला, परवा दिवशी बारामतीला आहोत अशा स्वरूपात त्यांनी 12 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम प्रसिद्धी माध्यमांना कळवले.
अजित पवारांचे काम वेगाने: यानंतर देखील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा कमी झाल्या नाहीत. मात्र आज दुपारी जेव्हा शरद पवार गोविंद बागेत आले आणि त्यांना पत्रकार भेटले, तेव्हा एक वेगळीच चर्चा झाली. शरद पवार यांना जेव्हा अजित पवार यांच्या या संदर्भात प्रश्न विचारले, तेव्हा शरद पवार म्हणाले, अजित पवार हे वेगाने कामे करण्यात प्रसिद्ध आहेत. काही लोकांना मीडियासमोर चमकण्याचा छंद असतो. काही लोकांना वृत्तपत्रांमध्ये नावे यावी यासाठी ते कामे करतात. तर काही लोक फक्त कामे करण्यासाठी प्रसिद्ध असतात. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत हे सर्वांना माहिती आहे. मी देखील जेव्हा कोणी भेटते तेव्हा त्यांची चर्चा करतो. याचा अर्थ असा नसतो की, त्या चर्चा राजकीय असतात; मात्र अजित पवार जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा गैर अर्थ काढला जातो. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया अजित पवारांच्या बाबतीत चुकीची वृत्त पसरवू नका, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार प्रामाणिक: माझ्या या निर्णयाची संपूर्ण माहिती अजित पवार यांना होती. खुद्द मीच त्यांना दिली होती. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काहीही शंका काढण्याचे कारण नाही. ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना फिल्डवर कामे करण्यात जास्त इंटरेस्ट आहे अनेक जण त्यांना यासाठी ओळखतात, अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली.
हेही वाचा: VHP Bajrang Dal : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा काय आहे संबंध?