बारामती - बारामतीत आज एकाच दिवशी ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ रुग्ण बारामती तालुक्यातील असून इतर ३ जण बाहेरील तालुक्यातील आहेत. हे रुग्ण बारामतीतील रुई ग्रामीण रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे बारामतीतील मृतांची संख्या ४९वर पोहोचली आहे.
बारामतीत कोरोना रुग्णांचे प्रस्थ वाढत असून मृतांचा आकडाही वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बारामतीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामतीत 'जनता कर्फ्यू' घोषित करण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार ७ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीसाठी हा 'जनता कर्फ्यू' असणार आहे. मात्र ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबरदरम्यान कोरोनाचा आढावा घेऊन पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील, असे आदेशात म्हटले गेले आहे. आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद असणार आहे.
यांना असेल सूट -
*रुग्णालये २४ तास सुरू राहणार.
*घरपोच दूध विक्री.
*पेट्रोल पंप, सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. (केवळ शासकीय व अत्यावश्यक वाहनांसाठी इंधन मिळणार.)
*वर्तमानपत्रे, डिजीटल प्रिंट मीडियाची कार्यालये व वृत्तपत्र वितरण सकाळी ६ ते ९ पर्यंत.
* सर्व बँका.
* चारचाकी व दुचाकी वाहनांचा वापर स्वत:च्या ओळखपत्रासह करता येईल. न्यायाधीश, वकील, शासकीय कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका, आशा वर्कर, वर्तमानपत्रे, डिजीटल प्रिंट मीडियाचे कर्मचारी, मेडिकल दुकानाचे कर्मचारी, दुध विक्रेते, गॅस, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, विद्युत विभागाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवास करता येणार आहे.