पुणे : तृतीयपंथीयांच्या आरोग्यविषयक समस्या वेगळ्या आहेत. त्यांना उपचार घेण्यासाठी देखील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेत, ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी अकरा मजली इमारतीत एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आलाय. यामध्ये सुरुवातीला 25 खाटांची व्यवस्था केलेली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते याचं उद्घाटन देखील करण्यात आलं.
तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड : याआधी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाअंतर्गत असलेल्या जी. टी. रुग्णालयात वॉर्ड नंबर 13 हा फक्त तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र दिला आहे. आता, ससूनमध्येही त्यांना स्वतंत्र उपचार मिळणार आहेत. या वॉर्डाला संलग्न स्वतंत्र प्रसाधनगृह, विशेष ओपीडी, तपासणी आणि उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहेत. तृतीयपंथीयांचा बाह्यरुग्ण विभाग, वैद्यकीय तपासणी, चाचणी, अॅडमिट करून घेण्याची सोय तसेच एक आयसीयू अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
तृतीयपंथीय रुग्णांना सन्मानाची वागणूक : याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी माहिती दिली की, जेव्हा मी याच बी. जे. मेडिकलमध्ये शिक्षण घेत होतो तेव्हा पाहिलं होतं की, तृतीयपंथीयांना अनेक आजार असतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्वतंत्र जागेचा अभाव होता. त्यांना पुरुष वॉर्डात की महिला वॉर्डात अॅडमिट करायचं, हा मोठा प्रश्न असायचा. अनेक समस्या येत होत्या. ही बाब लक्षात घेता या रुग्णांना मोफत उपचार मिळावा, म्हणून आम्ही तृतीयपंथीयांसाठी एक वेगळा वार्ड सुरू केलाय. तृतीयपंथीय रुग्णांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या तपासण्या, औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
रुग्णांना मोफत उपचार : तसंच ते पुढे म्हणाले की, आत्ता प्रायोगिक तत्वावर 25 बेडस् असलेला एक कक्ष तयार करण्यात आलाय. पुढे जशी गरज भासेल त्यानुसार बेडची संख्या वाढवण्यात येईल. आज ससून रुग्णालयात दररोज राज्यभरातून 1500 ते 2000 रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येत असतात. या गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाला पाहिजे. त्यांना समाधान मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ससून रुग्णालयाच्या बाबतीत विश्वसार्हता निर्माण व्हावी, त्यांना उत्तमोत्तम उपचार मिळावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
हेही वाचा :
- Doctor Day Special: डॉक्टर डे...ससून रुग्णालयाचे डीन स्वतः करतात शस्त्रक्रिया...पहा काय म्हणाले डॉ. संजीव ठाकूर
- Bariatric Surgery : ससून रुग्णालयात बॅरिएट्रिक वॉर्ड सुरु; मोफत आणि दुर्बिनीद्वारे केली जाते सर्जरी
- Sassoon Hospital Pune: ससूनमध्ये बाहेरुन औषधे आणण्याची चिठ्ठी दिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई