नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सर कार्यवाह मदनदास देवी यांचे निधन झाले आहे. मदनदास देवी यांनी बंगळुरू येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मदनदास देवी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यानंतर मदनदास देवी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक महत्वाची पदे भूषवली. मदनदास देवी यांच्या निधनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मोठा धक्का बसला आहे. पुणे येथे मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवारी देशाचे गृहमंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेता अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आदींसह अनेक नेतामंडळी येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला शोक व्यक्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मदनदास देवी यांच्यासोबतच्या दीर्घकाळातील सहवासाचे स्मरण केले. मदनदास देवी यांनी आपले जीवन देशसेवेसाठी समर्पित केल्याच्याभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. मदनदास देवी यांच्याशी आपले जवळचे नाते असून त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
बंगळुरू येथील रुग्णालयात निधन : मदनदास देवी यांचे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सोमवारी सकाळी ट्विट करून देण्यात आली. मदनदास देवी यांनी त्यांनी ABVP चे राष्ट्रीय संघटन मंत्री आणि संघाचे सह सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळली.
अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार पार्थिव : मदनदास देवी यांचे पार्थिव आज दुपारी 1.30 ते 4.00 या वेळेत 'केशवकृपा' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथील कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
उद्या पुण्यात होणार अंत्यसंस्कार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह पद मदनदास देवी यांनी भूषवले होते. त्यांच्या जाण्याने संघाच्या स्वयंसेवकांचा मार्गदर्शक हरपला आहे. उद्या, मंगळवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत मदनदास देवी यांचे पार्थिव पुण्यातील मोती बाग येथील 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'च्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी अमित शाह यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेता त्यांचे अंत्यदर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मदनदास देवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.