बारामती - आपले ध्येय साध्य करत असताना आपल्या आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता अफाट इच्छाशक्ती व प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश नक्की मिळू शकते. याचीच प्रचिती बारामतीतील अमराई येथील सुरज सुभाष मोरे आणि शुभम मिलिंद शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यावरून येते. याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष रिपोर्ट...
छोट्या खोलीत केला अभ्यास - सूरज आणि शुभम हे दोघेही अतिशय सामान्य कुटुंबातील असून दहा बाय दहाच्या खोलीत राहतात. दोघांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सुरजचे वडील सेंट्रिंगचे तर शुभमचे वडील हे गॅरेज मध्ये काम करतात. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी सुरज व शुभम यांनी एमपीएससीचा चिकाटीने अभ्यास करून राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला - आई अशिक्षित व वडील सेंट्रींगच्या कामावर मजुरी करणारे असूनही त्यांना आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा. माझ्या मुलाची प्रेरणा इतरांनी घ्यावी अशी इच्छा होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासासाठी ठेवले. वेळोवेळी आवश्यक ती मदत केली. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने व प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली, अशी भावना सूरज मोरे यांनी व्यक्त केली.
लय आनंद वाटतोय - घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून सूरजने पुण्यात राहून अभ्यास केला. आज तो साहेब झाला. याचा आम्हाला लय आनंद वाटतोय. त्याने अजून मोठ्या पदावर जावं अशी आमची इच्छा आहे. अशी भावना आई सुनंदा व वडील सुभाष यांनी व्यक्त केली.
तर अधिकारीच व्हावे लागेल - वडील गॅरेजमध्ये काम करतात. घरातील मी मोठा मुलगा, घरची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर अधिकारीच व्हावे लागेल. यासाठी मी सन 2015 पासून एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. 2016 ला पहिला प्रयत्न केला. तेव्हा मुलाखतीपर्यंत पोहोचलो. पुन्हा 2018 साली प्रयत्न केला मात्र अपयश आले. सन 2019 ला घेण्यात आलेल्या परीक्षेत माझी निवड झाली. माझ्या या यशात माझे वडील, हॉस्पिटलमध्ये काम करणारा लहान भाऊ, दुसऱ्याकडे घरकाम करणारी माझी आत्या यांचा मोलाचा वाटा आहे. यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले, अशी भावना शुभम शिंदे यांनी व्यक्त केली.
अन् मेकॅनिकलचे साहेब म्हणू लागले - प्रत्येक मुलाने शिकून आपल्या आई बापाचे नाव मोठे करावे. आज माझ्या मुलामुळे मला गॅरेजच्या वर्कशॉप मध्ये गेल्यावर सहकारी कामगार साहेब म्हणून बोलू लागले आहेत. अशी भावना शुभमचे वडील मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केली.