पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणासह महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 53 हजार रुपये किंमतीचा 18 किलो 137 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिली. बेबी भारत बाटुंगे (वय 52 ) आणि साहिल मुसा शेख (वय 19 ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. दोघेही जळगाव जिल्ह्यातील तामापूर गावाचे रहिवाशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील पवळे उड्डाण पुलाखाली गांजा विक्री करण्यासाठी जळगाव येथील अज्ञात व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शाकिर जिनेडी आणि संदिप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पवळे उड्डाण पुलाखाली सापळा रचून तरुणासह महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्या प्रवाशी बॅगेत तब्बल 4 लाख 53 हजार रुपये किंमतीचा 18 किलो 137 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे.
संबंधित लाखो रुपयांचा गांजा विक्री करण्यासाठी आणला असल्याची कबुली पोलिसांना दोन्ही आरोपी यांनी दिली आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदरणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस कर्मचारी शाकीर जिनेडी, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, शकुर तांबोळी, संदीप पाटील, संतोष दिघे, शैलेश मगर, संतोष भालेराव, अशोक गारगोटे, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, प्रसाद कलाटे, अजित कुटे, प्रदीप गुट्टे व महिला पोलीस नाईक वाव्हळ यांनी केली आहे.
हेही वाचा - रिक्षात विसरलेले 11 तोळे सोने अन् रोख रक्कम परत करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकाचा पोलिसांकडून सन्मान