पुणे - कोरेगाव भीमा पेरणे येथील जयस्तंभ परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत. कोरेगाव-भीमाला अभिवादन कार्यक्रमासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रामुख्याने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजूबाजूच्या जवळपास १५ गावांमध्ये ३० डिसेंबर २०२० ला रात्री १२ पासून ते २ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बाहेर गावातील लोकांना या गावात येण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा त्याकरिता लागणारे मंडप, खाद्यपदार्थ स्टॉल, खेळणी विक्री यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रतिबंध असलेल्या गावात लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे तसेच शस्त्र व लाठी-काठी बाळगणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहितेचा अंमल चालू
सरकारने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर पेरणे येथील जयस्तंभ कार्यक्रम संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. कोविड-19 च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी गणेश उत्सव, नवरात्र, ईद, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हे प्रतिकात्मक व अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आलेले होते. तसेच सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहितेचा अंमल चालू आहे. त्यामुळे पेरणे व इतर आजूबाजूच्या गावांमध्ये मोठी गर्दी जमू नये यासाठी 144 कलम लागू करण्यात येणार आहे.
बाहेर गावातील व्यक्तींना प्रवेश नाही
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाला बाहेरून येणारे नागरिक व इतर लोक यांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने लोणीकंद पो.स्टे. हद्दीलोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी, बढु खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव व शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढ़ बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये 30 डिसेंबर ते 02 जानेवारीपर्यंत बाहेर गावातील व्यक्तींना या गावांमध्ये यायला प्रतिबंध करण्यात आला आहे. पासधारक व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश असणार आहे.