पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना संचारास मनाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत. 1 जून ते 30 जूनपर्यंत दररोज रात्री 9 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 लागू केल्याचे या आदेशात जाहीर करण्यात आले आहे.
लॉकडाऊनला सरकारने मुदतवाढ दिली आणि टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करण्यासाठी तसेच निर्बंध कमी करण्यासाठी "मिशन बिगीन अगेन"बाबत अधिसूचना जाहीर केली. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात लोकांनी येऊ नये. सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे थांबावे, तसेच काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असल्याने सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्याकरता तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामुळे, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 लागू केल्याचे या आदेशात जाहीर करण्यात आले आहे.