आळंदी (पुणे) - ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या तालावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा आज (शुक्रवारी) होणार आहे. दरवर्षी सकाळपासूनच संपूर्ण आळंदी नागरी ज्ञानोबा तुकोबांच्या गजराने दुमदुमून निघते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आळंदी परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.
आज दुपारी 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरापासून पालखी सोहळ्याच्या प्रस्थान कार्यक्रमाला सुरुवात सुरुवात होणार आहे. सकाळी पहाटे घंटानाद, काकडा, पावमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती समाधी मंदिरात करण्यात आली आहे. विना मंडपात भजन, किर्तन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी न होण्याच्या दृष्टीने मंदिराचे ट्रस्टी आणि प्रशासनाकडून उत्तम प्रकारे काळजी घेतली जात आहे.
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य वारकरी आळंदीत येत असतात. प्रस्थान होण्याच्या आधी काही दिवस आळंदी परिसरात सर्वत्र वारीचे उत्साहपूर्व वातावरण दिसून येते आणि संपूर्ण आळंदी पंचक्रोशी माऊली-तुकारामांच्या गजरात दुमदुमून जाते. मात्र, यंदा मागच्या वर्षीप्रमाणेच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोनाचे संकट पाहता प्रशासनाकडून मर्यादित वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. प्रस्थान सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या 21 वारकऱ्यांना व देवस्थानातील 1 कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याने प्रस्थान सोहळ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्याचा प्रवास असा - दुपारी 4 वाजेच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यानंतर पादुका मंदिराच्या शेजारील आजोळ घरात विसावा घेणार आहेत. 3 जुलै ते 19 जुलै संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आजोळ घरीच मुक्कामी राहतील. दिनांक 19 जुलैला सकाळी 10 वाजता पादुका पंढरपूरकडे शासनाच्या बसने निघतील. त्यानंतर 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी राहतील. यानंतर 24 जुलैला पौर्णिमेचा प्रसाद घेऊन शासकीय बसने परतीच्या प्रवासाला निघतील. |
गेल्या वर्षीप्रमाणे मंदिराच्या परिसरात शुकशुकाट असला तरी पालखीच्या प्रस्थानाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराबाहेर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याठिकाणी वारकरी, ट्रस्टी यांच्या तपासणीसाठी डॉक्टर आणि नर्सही तैनात करण्यात आल्या आहेत.