आळंदी(पुणे)- दिवाळी पाडव्याला देवदेवतांची प्रार्थनास्थळे भाविकभक्तांसाठी नियमावलींच्या आधिन राहून खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर संपूर्ण वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर दिवाळी पाडव्याला दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दर्शनबारी, मंदिर परिसर साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. भाविक व वारकऱ्यांना कोरोनाच्या नियमावलीनुसारच दर्शनाला परवानगी दिली जाणार आहे.
भाविकांनी नियमांचे पालन करावे -
राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या निर्णय शासनदरबारी घेण्यात आला आहे. आळंदी देवस्थानाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मंदिर खुली होत असताना संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिर व परिसर स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे. भाविक व वारकरी माऊलींच्या दर्शनाला येत असताना दर्शनबारीतूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. यामध्ये भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पालन करण्याचे आवाहन मुख्य विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी केले आहे.
गेल्या सात महिन्यांपासून संत ज्ञानेश्वर माऊलींचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद होते. आता मंदिर खुले करण्यापूर्वी भाविकांनी सोशल डिस्टिंशिंग काटेकोर पालन करावे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी, थर्मल स्कँन, सॉनिटाझर, पाणी, या सर्व गोष्टी मंदिर परिसर व दर्शनबारीतूनच उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर भाविकांनीही कोरोनाचा समूहसंसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, गरोदर माता, वयोवृद्धांनी मंदिर परिसर व गर्दीच्या ठिकाणी येण्याचे टाळावे, असे आवाहन आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी केले आहे.
दर्शन अमर्याद भाविकांसाठी खुले...
संजीवन समाधी मंदिर सोमवार पासुन दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. प्रत्येक तीन तासांनी मंदिर सॅनिटाइजर करण्यासाठी अर्धातास दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीकडून देण्यात आली.