पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज अलंकापुरीतून प्रस्थान झाल्यानंतर दिवेघाटातून जेजुरीमार्गे पुढे पंढरीकडे मार्गस्थ झाली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आज पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. यंदाचा पालखी सोहळा हा एसटीच्या विठाई बसमधून होत आहे. प्रत्येक वर्षी आषाढी वारीचे विशाल रुप दिवेघाटातून दिसत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे वारीचा सोहळा हा वीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे.
आज दुपारी माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान, ही बस पाच वाजता दिवेघाटातून पुढे पंढरीकडे रवाना झाली. हा सोहळा होत असताना वारकऱयांना आपल्या भावना अनावर झाल्या. मोठ्या दिमाखात दिसणारे वारीचे दिवेघाटातून रुप यावर्षी दिसेनासे झाले. दिवेघाटाची नागमोडी वळणे घेत हरिनामाचा गजर होत असताना वारीचा देखणा सोहळा यावर्षी बसमधून पार पडत आहे.