पुणे : महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहिलो तर कसब्याप्रमाणे निकाल लागतो आणि जर थोड जरी इकडं तिकडं झालं किंवा बंडखोरी झाली तर चिंचवड प्रमाणे निकाल लागतो. हा या दोन्ही मतदार संघातील मतदारांनी दिलेला धडा आहे. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा राज्यातील राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. महाविकास आघाडीने एकजूट दाखवली तर 2024 साली विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि लोकसभेला 40 जागा जिंकू असे मी खात्रीने सांगू शकतो, असे राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत पुण्यात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी ते बोलत होते.
चिंचवडमध्ये भाजप विजयी : ते पुढे म्हणाले की, चिंचवड मध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. नक्कीच त्या ठिकाणी आमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत. चिंचवड मध्ये अनेक वर्ष जगताप पॅटर्न चालतो. हा जगताप पॅटर्नचाच विजय आहे. बंडखोर उमेदवार कलाटे यांना थांबवलं असत तर निकाल वेगळाच लागला असता, असे देखील राऊत यावेळी म्हणाले. या दोन्ही निवडणुकीत सत्तेचा वापर झालं आहे यावर राऊत म्हणाले की, कसबा येथे जो सत्तेचा वापर झाला आहे त्याला कसब्यातील सुजाण मतदारांनी चपराक दिली आहे.
पुणेकरांना विकत घ्यायचा प्रयत्न : पुणेकरांना विकत घ्यायचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. याबाबत पुणेकर अभिनंदनास प्राप्त आहेत. कसबा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असे यावेळी राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र दिसेल का यावर राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था विषय स्थानिक पद्धतीने घेतला जातो. मी देखील नाना पटोले यांच्या मताशी सहमत आहे. आमची चर्चा विधानसभा आणि लोकसभेसाठी चालली आहे, असे राऊत म्हणाले.
फुटीर लोकांबद्दल हे वक्तव्य केलं : राऊत यांनी विधानसभेच्या अधिवेशनावर केलेल्या वक्तव्यावरून मोठं गोंधळ उडालेला पाहायला मिळालं यावर शिंदे गटाचे आमदारांकडून राऊत यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. यावर राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, शिंदे गटाच्या मागणीने अटक होणार असेल तर होऊ दे. न्यायालय आणि पोलीस हे अजूनही खोक्याखाली चिरडलेले नाही. अजूनही काही रामशास्त्री जिवंत आहे. 40 आमदारांनी आधी स्वतःच अंतरंग तपासावे. मी विधिमंडळचा पूर्ण आदर करतो. माझं विधान हे एका विशिष्ट गटासाठी होतं हे सगळ्यांना माहीत आहे. मी फुटीर लोकांबद्दल हे वक्तव्य केलं आहे. विधिमंडळाला असं बोलायला वेडा नाही. माझा वक्तव्य फक्त एका व्यक्ती पुरते होतं. मला आलेली नोटीस मी वाचली नाही. मी दौऱ्यावर आहे. नोटीस वाचून ठरवेण काय करायचे ते आणि मग उत्तर देईन, अस यावेळी राऊत म्हणाले. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावर राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, संदीप देशपांडेचा विषय मला माहिती नाही. मी त्यावर बोलणार नाही. कोणी कोणावर हल्ला करत असेल तर गृहमंत्र्यांनी त्यात लक्ष घालायला पाहिजे, असं यावेळी राऊत म्हणाले.