पुणे - नुकतेच काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब याच्या कबरला भेट देऊन ते नतमस्तक झाले होते. यावरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आता यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आंबेडकरांना सुनावले - छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापन करताना ज्या औरंगजेब याने ठार मारण्याचा प्रयत्न केला, ज्या औरंगजेबने संभाजीराजे यांची हत्या केली. असा या औरंगजेबचे उदातीकरण कशाला करायचे. उलट जर तुम्हाला अभिवादन करायचे असेल तर तुम्ही शिवाजी महाराज यांच्या समाधीला जाऊन करायला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा महाडला गेल्यावर न चुकता रायगडवर जाऊन अभिवादन करायचे.
औरंगजेबचे उदात्तीकरण करण्याची कोणालाच गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या समाधीसमोर नतमस्त व्हा - छत्रपती संभाजीराजे
राजर्षी शाहू महाराज यांची 149 वी जयंती - समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 149 वी जयंती साजरी केली जात आहे. सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा, प्रत्येक नागरिकांना समान न्याय मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांना आठवले जाते. महाराजांची आज 149 वी जयंती आहे. आज जयंतीच्या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
राजश्री शाहू महाराज रोल मॉडेल - यावेळी संभाजी राजे म्हणाले की, शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. समतेचा लढा शाहू महाराज यांनी उभा केला. तसेच बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका कोणी घेतली असेल तर राजेंनी घेतली होती. तसेच वंचितांना न्याय देण्याचे काम शाहू महाराज यांनी केले. आज राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सर्वच पक्षांना शाहू महाराज यांना सोडून राजकारण करता येणार नाही. राजश्री शाहू महाराज आजही राज्याचे रोल मॉडेल असल्याचे यावेळी संभाजी राजे म्हणाले.
खालच्या पातळीचे राजकारण - सध्या राज्याच्या राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टिका केली जात आहे. यावर छत्रपती संभाजी राजे यांना विचारलं असता ते म्हणाले की, सध्या जे चालले आहे ते महापुरुषांचे विचार नाहीत. महाराष्ट्र असे राज्य आहे जिथे आपल्याला महापुरुषांचे विचार पाहायला मिळतात. सध्या जे चालले आहे.ते आपल्या राज्याचे संस्कार नाहीत. राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आत्मसात करून त्यांचे विचार पुढे न्यायला पाहिजेत. तसेच ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते, त्याचप्रमाणे शाहू महाराज यांची जयंती देखील साजरी व्हायला पाहिजे, असे देखील यावेळी राजे म्हणाले.
हेही वाचा - Aurangzeb controversy : प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला वाहली फुले, नव्या वादाला फोडले तोंड