पुणे - देहू येथून आज दुपारी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका बसने पंढरपूरला रवाना झाल्या. ज्या बसमधून पादुका नेल्या जात आहेत त्या बसची फुलांनी सजावट केली असून पहिल्याच आसनावर पादुका ठेवल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या पादुकांचे दर्शन घेतले. भारत देश लवकर कोरोनामुक्त होवो, अशी प्रार्थना त्यानी तुकोबांच्या चरणी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आषाढी वारी आणि पालखी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. शासनाने परवानगी दिल्याने राज्यातील मानाच्या पालख्या वाहनांनी पंढरपूरला नेल्या जात आहे. यामुळेच आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे बसमधून पंढरपूरला मार्गस्थ झाल्या. पादुकांसोबत बसमधून जाणाऱ्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तर 60 वर्षांवरील व्यक्तींना पादुकांसोबत जाण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही.
12 जूनला जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचा मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पडला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पादुका या मुख्य मंदिरातच विसावल्या होत्या. आज त्या बसने पंढरपूरला मार्गस्थ झाल्या. पादुका घेऊन जाणाऱ्या बसला विशेष सुरक्षा दिली गेली असून श्वान पथकाने बसची तपासणी केली. बसच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस बंदोबस्त असणार आहे.