पुणे Rupali Chakankar On NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा यावर न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. त्या आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होत्या. राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबत चाकणकर म्हणाल्या, "मी न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक सुनावणीला हजर होते. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं आम्ही पालन केलं आहे. मला विश्वास आहे की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निर्णय सकारात्मक लागेल.
अजित पवारांना प्रतिनिधींचा पाठिंबा : नवाब मलिक यांच्याबाबत चाकणकर म्हणाल्या की, विकास कामांसाठी प्रत्येक प्रतिनिधी निवडून आलेला आहे. त्याच पद्धतीनं सर्व प्रतिनिधी काम करत आहेत. अजित पवार यांच्या कामामुळं प्रतिनिधी त्यांच्या पाठिमागं खंबीरपणे उभे असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे.
पुणे शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा : पुढं बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, खडकवासला मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत बैठक झाली. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजच्या बैठकीत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेत, शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केल्याचं चाकणकर म्हणाल्या.
विकृत मानसिकतेतून माझ्यावर पोस्ट : सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत चाकणकर म्हणाल्या की, महिलांबाबत अश्लील पोस्ट टाकून त्यांची बदनामी करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय. मी राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून ई-सायबर सुरक्षा सुरू केली आहे. माझ्याविरुद्ध देखील अशाच पोस्ट केल्या जात आहेत. निश्चितपणे काही लोकांनी विकृत मानसिकतेनं माझ्यावर पोस्ट केली. याबाबत माझ्या भावानं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. राजकारणात काम करताना विचारांची लढाई, विचारांनी लढली पाहिजे, तत्त्वांची लढाई तत्त्वांनीच लढली पाहिजे, असं मत चाकणकर यांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा -