पुणे Rohit Sharma : भारतीय क्रिकेट टीम सध्या पुण्यात मुक्कामी आहे. गुरुवारी (१९ ऑक्टोबर) पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर भारताचा सामना बांग्लादेशशी होईल. त्यापूर्वी भारतीय संघाचा पुण्यात सराव सुरू आहे.
रोहितवर वाहतूक पोलिसांची कारवाई : दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मासोबत एक घटना घडली. रोहित शर्माविरुद्ध पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी तीन चालान जारी केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अतिशय वेगानं गाडी चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. रोहित त्याच्या स्वत:च्या कारनं पुण्याला जात होता. त्यावेळी त्यानं वाहतुकीचे नियम मोडले.
कारचा वेग मर्यादेपेक्षा दुप्पट होता : वाहतून अधिकाऱ्यांनं सांगितलं की, रोहितच्या कारचा वेग ताशी २०० ते २१५ किमी होता. त्यामुळे त्याच्या वाहनावर तीन ऑनलाइन ट्रॅफिक चालान जारी करण्यात आले. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनाच्या कमाल वेगाची मर्यादा ताशी १०० किमी एवढी आहे. यापेक्षा जास्त वेग असल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. यासाठी एक्स्प्रेसवेवर ठिकठिकाणी अनेक कॅमेरे लावण्यात आले आहेत. रोहित शर्माकडे निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी कार आहे, जिचा नंबर ०२६४ असा आहे. २६४ ही एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही खेळाडूची सर्वोच्च धावसंख्या आहे, जी रोहितनं श्रीलंकेविरुद्ध बनवली होती.
ऋषभ पंत थोडक्यात बचावला होता : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही वेगाचा शौकीन आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या कारचा भीषण अपघात झाला होता. तो रुरकीला त्याच्या आईला भेटण्यासाठी जात होता. या अपघातात पंतचा जीव थोडक्यात बचावला. या दुर्घटनेला जवळपास एक वर्ष होत आलं तरी पंतला अद्याप टीम इंडियामध्ये पुनरागमन करता आलेलं नाही.
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : हिटमॅननं मोडला षटकारांचा आणखी एक रेकॉर्ड, गोलंदाजीत बुमराहची कमाल
- Cricket World Cup २०२३ : रोहितनं वेळोवेळी केली शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा, आता अडथळा पाकिस्तानचा!
- Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रोहितची गाडी सुसाट! सर्वाधिक शतक, सर्वाधिक षटकार; जाणून घ्या किती रेकॉर्ड मोडले