पुणे Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची, यावर निवडणूक आयोगाकडे लढाई सुरू आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, शरद पवार यांना लोकशाहीच्या माध्यमातून लढल्या जाणाऱ्या लढाईवर विश्वास आहे. त्यांचे कार्यकर्ते, लोक यांच्यावर जास्त विश्वास आहे. त्यामुळं निवडणूक आयोग काय निर्णय देईल हे सांगता येणार नाही, पण निवडणूक आयोगाबाबत सामान्य नागरिकांमध्ये मत निर्माण झालंय. ते असं आहे की, निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाच्या हातातील बाहुलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोग काय निर्णय घेऊ शकतो, याचा अंदाज काही प्रमाणात लागू शकतो. पण, जेव्हा हा विषय कोर्टात जाईल, तेव्हा न्यायालय नक्कीच आमच्या बाजूनं निर्णय घेईल, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय.
आंदोलनाचा इशारा : कंत्राटी भरतीबाबत गैरसमज झालाय. तो निर्णय महाविकास आघाडीच्या काळातील आहे, असं सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. यावर रोहित पवार म्हणाले की, गेल्या सरकारच्या वेळेत निर्णय हा फक्त लेबर विभागापुरता मर्यादित होता. त्यात ठराविक पोस्ट घेण्यात आल्या होत्या, त्याही खूप मर्यादित होत्या. पण, आता सरकारनं जो जीआर काढलाय तो सगळ्या विभागांना लागू करण्यात आलाय. आधीच्या सरकारमधील निर्णय आणि आताच्या सरकारमधील निर्णय यात खूप फरक आहे. गेल्या सरकारच्या काळात ही निर्णय झाला असेल तर त्यालाही समर्थन नाही. त्याचाही निषेध करतो. आत्ताच्या सरकारचाही निषेध करतो. जीआर मागे घ्यावा, नाहीतर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिलाय. (Election Commission on NCP Sign and name)
सुप्रिया सुळेच आमच्या उमेदवार : लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता सुनेत्रा पवार असतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर रोहित पवार म्हणाले की चर्चेवर विश्वास ठेऊ नका. वेळ घालवू नका, भाजपासोबत जे गेलेत ते त्यांचं ते ठरवतील. सुप्रिया सुळेच आमच्या उमेदवार असतील. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनात त्या लढतील. त्यांच्या विरोधात कोण उभं राहतं, हे येणाऱ्या काळात पाहू.
भाजपाच्या चिन्हावर निवडणूक : लोकसभेसाठी कल्याणची जागा श्रीकांत शिंदे हे भाजपाकडून लढवतील, यावर रोहित पवार म्हणाले की, मी जेव्हा कल्याणला गेलो तेव्हा सामान्य लोक, विविध पक्ष आणि भाजपाच्या लोकांबरोबर देखील चर्चा झालीय. त्यात सर्व्हे हा चव्हाण यांच्या नावानं झालाय. श्रीकांत शिंदे यांचे आमदारांचे पदाधिकाऱ्यांचे वाद झालेले आपण पाहिले आहेत. त्यामुळं तिथं येणाऱ्या काळात भाजपा क्लेम करेल, असं तेथील कार्यकर्त्यांना वाटत आहे. तसंच आज यांना वाटत आहे की, त्यांना पक्ष मिळालाय. त्या लोकांना लोकसभा निवडणूक नंतर भाजपाच्या चिन्हावर लढवावी लागणार आहे, असं काही तज्ञ लोकांचं म्हणणं आहे, असं देखील यावेळी पवार म्हणाले. भावी मुख्यमंत्री म्हणून जी होर्डिंग लावण्यात आली आहेत. त्याबाबत रोहित पवार म्हणाले की, कधीकधी कार्यकर्त्यांना कंट्रोल करता येत नाही. उद्या अमेरिकेचा प्रेसिडेंट म्हणून बोर्ड लावतील, आपण विश्वास ठेवणार का? मी पदाला कोणतीही किंमत देत नाही, आम्ही संघर्ष करत आहोत, असं यावेळी रोहित पवार म्हणाले.
भाजपावर टीका : अजित पवार हे भाजपासोबत गेले आहेत. भविष्यात काय होईल, यावर रोहित पवार म्हणाले की, मी अजित पवार यांच्या बाबतीत काही सांगणार नाही. पण, आज पंकजा मुंडे यांच्यासोबत काय होत आहे, हे आपण पाहात आहे. गोपीनाथ मुंडे यांनी हा पक्ष उभा राहण्यासाठी किती त्याग केला, परिश्रम घेतले हे सगळ्यांना माहीत आहे. पण, आज त्यांच्या कारखान्याला मदत पाहिजे असता ती करण्यात आली नाही. भाजपाला लोकनेते चालत नाहीत, तसंच बाहेरून आलेले देखील चालत नाहीत, अशी टीका देखील यावेळी रोहित पवार यांनी केलीय.
हेही वाचा :