हिंगोली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून शक्य ती मदत करत आहेत. नुकतच त्यांच्या माध्यमातून बारामती अॅग्रोच्यावतीने हिंगोली जिल्ह्यासाठी 475 लिटर सॅनिटायझरचा मोफत पुरवठा केला गेला आहे. याचा अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी हे सॅनिटायझर आपत्ती व्यस्थापन कार्यालयाकडे सुपुर्द केले आहे. यावेळी जावेदराज, अमित कळासरे, बालाजी घुगे, सुजय देशमुख, मुन्ना इंगोले यांची उपस्थिती होती. सध्या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण होत आहे. परिणामी, दिवसरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासन अनेक प्रयत्न करत आहे. अशा विदारक परिस्थितीचा सामना कर्तव्ये बजावणाऱ्या आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन आणि इतर विभागाचे कर्मचारी यांना करावा लागत आहे. यामुळेच रोहित पवार यांनी 475 लीटर सॅनिटायझर जिल्ह्यासाठी मोफत दिले आहे.