पुणे - कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तब्बल २० हजार लिटर सॅनिटायझरचे वितरण करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूरसह १६ जिल्ह्यांमध्ये याचे वाटप करण्यात येत आहे.
ससून, नायडू रुग्णालयासह पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरातही याचे वितरण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध आरोग्य केंद्रे, पोलीस आयुक्तालये यांच्याशी संपर्क ठेवत त्यांनी हे काम सुरु केले आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा आहे. ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी घरातूनच राज्यभरातील युवकांशी संपर्क व संवाद साधत उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला आहे.
रोहित पवार यांच्या या 'वर्क फ्रॉम होम'चे राज्यभरातून कौतुक होत आहे. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व बारामती अॅग्रो लिमिटेडच्या मदतीने प्रमुख शहरांमधे २० हजार लिटरपेक्षा जास्त सॅनीटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील पोलीस यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच त्या भागातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे यांच्या वापरासाठी हे सॅनिटायझर पाठवण्यात येत आहेत. याशिवाय पुण्यात ससून आणि नायडू संसर्गजन्य विकार उपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाँक्टर, परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांकरीता प्रतिबंधक चष्मेही वितरीत करण्यात आले आहेत.