पुणे - जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावातील बाजारपेठेतल्या ८ दुकांनावर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे. भर गावात पडलेल्या दरोड्याने गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरोडा पडलेल्या दुकानांमध्ये पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी-पेंढार गावात मोठी बाजारपेठ आहे. यात शेतीउपयोगी वस्तु, खते, बि-बियाणे, औषधे, हार्डवेअर, किरणा अशी विविध दुकाने या बाजारपेठेमध्ये आहेत. याच बाजारपेठेत आज मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात दरोडेखोरांना एकाच लाईनमधील ८ दुकानांचे शटर उघडून चोरी केली आहे. या दरोड्यात किती मुद्देमाल लंपास केला आहे याचा सविस्तर पंचनामा सुरु असून पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीनंतर आता पावसाची सुरुवात झाली असून शेतीची कामे सुरू होण्याच्या मार्गावर असताना गावात दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.