बारामती - इंदापूर तालुक्यातील काटी गावात धारदार शस्त्रांचा धाक दाखवून चोरट्यांनी १ लाख ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी (दि. २१) मध्यरात्री घडली. याप्रकरणी रत्नमाला सीताराम खरात (वय ६०.रा.काटी.ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारदार कोयता आणि शस्त्रांचा धाक दाखवून चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख, २३ हजाराचे मंगळसूत्र, १९ हजाराचे गंठण, ३ हजाराचे एक ग्रॅम बदाम, ९ हजारांचे तीन ग्रॅमचे कानातले, चांदीची साखळी, सोन्याची चमकी, चांदीची जोडवी व दोन मोबाइल लंपास केले आहेत.
दरवाजा तोडून केला घरात प्रवेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील काटी गावातील रत्नमाला खरात आणि त्यांचे पती व नात झोपले असताना दरवाजा तोडून सहा व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यापैकी एकाने हातातील लोखंडी कोयता नात श्रावणी हिच्या गळाला लावून घरातील दागिने व पैसे काढले. मुलीला जीवे मारून टाकेल, अशी धमकी देत चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू, दागिने कुठे आहेत याची विचारणा केली आणि त्या गोळा केल्या. फिर्यादीने अंगावरील दागिने काढून देत असताना एकाने त्यांच्या पती व नातीच्या पायावर काठीने मारहाण केली. कोणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकू अशी धमकी देत चोरटे तेथून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरीच्या या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे करीत आहेत.