पुणे - 26 जुलैला भारतीय सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या शेवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारले आणि तेव्हापासून 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या विजयाला आज २१ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने हिमगिरीच्या शिखरावरील विजयाच्या थरारक अशा काही आठवणींबाबत ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत..
या युद्धात पाकिस्तानचे दीड हजार सैनिक मारले गेले. भारताचेही 543 जवान हुतात्मा झाले तर 1300 हुन अधिक जवान जखमी झाले. या युद्धात हुतात्मा झालेले भारतीय सैनिक 19 ते 28 या वयोगटातले होते. भारतीय जवानांनी या युद्धात महापराक्रम गाजवला. चार परमवीरचक्र, चार महावीरचक्र, 29 वीरचक्र आणि 72 सेना मेडल्स आपल्या सैनिकांना देण्यात आली.
काश्मीरच्या सीमेवर दोन लाख सैनिक पहारा देत असतात. परंतु ज्या कारगिलची सीमा काश्मीरच्या दुप्पट आहे. त्या ठिकाणी भारताचे दोन-तीन हजार सैनिक तैनात होते. ज्या भागात भारतीय सैनिक नव्हते, त्याच भागात पाकिस्तानने आपलं सैन्य घुसवत कारगिलच्या डोंगरावर कब्जा केला होता. कब्जा केलेला हा भाग 13 हजार फुटापासून ते 18 हजार फुटापर्यंत आहे. या भागात वर्षातील सहा महिने बर्फ पडतो आणि हा बर्फ येथील जमिनीवर साचलेला असतो. हा भाग बर्फाळ आणि डोंगराळ असल्यामुळे कोणतही आधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या शस्त्राचा वापर या ठिकाणी केला जाऊ शकत नव्हता. हे युद्ध फक्त पायदळाचं होतं. यामध्ये पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून विजय मिळवायचा होता.
किंवा त्याच तिरंग्यात लपेटून येईन- शेरशाह
कॅप्टन विक्रम बत्रा हे या युद्धातले पहिले अधिकारी होते, की ज्यांना परमवीर चक्राने गौरवण्यात आले. त्यांचे सहकारी त्यांना 'शेरशाह' म्हणायचे. अठरा महिन्यापूर्वीच ते सैन्यदलात भरती झाले होते. युद्धाच्या वेळेस जेव्हा त्यांची या मोहिमेवर निवड झाली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 'मी भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्याच ध्वजामध्ये लपेटून परत येईल. पॉईंट 5140 वर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केलेले शिखर ताब्यात घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. विक्रम बत्रा यांनी अतिशय कठीण परिस्थितीत या शिखरावर चढाई केली. तीन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. या युद्धात ते जखमी झाले आणि तिथेच त्यांना वीरमरण आले. युद्धाला जाण्यापूर्वी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'ये दिल मांगे मोर' अशी भावना व्यक्त केली होती. एका युद्धात ते यशस्वी झाले होते परंतु त्यांना अजून दुसरे शिखर मिळवायचं होतं.
सेकंड राजपुताना रायफलचे विजय थापर हे बारा जवानांच्या घातक टीमचे कॅप्टन होते. त्यांनी आपल्या प्लाटूनला लीड केले होते. तोलोलिंग शिखर काबील केल्यानंतर त्यांनी पिंपल आणि नौल या शिखरांवर चढाई करत 15 मीटर अंतरावरून पाकिस्तानी सैन्यावर हल्ला चढवला. यामध्ये त्यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. या लढाईत त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले.