पुणे - शहरातील कोरोना बाधित भागात लागू केलेले अतिरिक्त निर्बंध गुरुवारी मध्यरात्रीपासून शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू आणि किरणामाल विक्रीची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत खुली राहतील. कोरोना रुग्णांची संख्या कमी असणाऱ्या भागात दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
पुणे शहरातील काही भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आल्यानंतर सोमवारपासून या भागात अतिरिक्त निर्बंध लागू केले होते. शहरात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश 3 मेपर्यंत कायम राहणार असल्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले.
शहराच्या पूर्वभागातील समर्थ, खडक, फरासखाना, कोंढवा, स्वारगेट, बंडगार्डन, दत्तवाडी, येरवडा, खडकी, वानवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी अतिरिक्त निर्बंध लागू केले होते.