पुणे - अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी आपल्या मुलाला वाचवा, अशी विनंती खासदार नारायण राणेंनी आपल्याकडे केली होती. मात्र, आपण त्या विनंतीला नकार दिल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. मंत्री पाटील यांनी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेवडेकरांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
सरकारी कामात अडथळा आणला म्हणून खुनाच्या प्रयत्नापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी कुटूंबीयांना सांगितले. तसेच, याप्रकरणी नारायण राणे यांनी मुलाला वाचवण्याची विनंती केली. मात्र, आपण त्याला नकार दिल्याचे पाटील यांनी कुटूंबीयांना सांगितले.
शेडकर कुटूंबीय मूळचे कोल्हापूरचे आहे. सध्या ते पुण्यात वास्तव्याला आहेत. तर अभियंता शेडेकर हे कोकणात नोकरीला आहेत. पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर शेडेकरांच्या वयोवृद्ध आई वडिलांना अश्रू अनावर झाले. घरात लग्न असूनही ते कामावर गेले होते. काही चूक असेल तर तक्रार करायला हवी होती. मात्र, असे कृत्य करायला नको होते. असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.
शेडेकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. याप्रकरणी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक कारवाईचे निर्देश दिल्याचेही पाटील यांनी सांगितले.