पुणे - जिल्ह्यातील खडकवासला साखळी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. येत्या काही तासात पुण्याच्या घाट माथ्यावर तसेच पुण्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पुण्यात 'रेड अर्लट' जारी करण्यात आला आहे.
पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून बुधवारी रात्री 41 हजार 624 क्युसेक पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आले. खडकवासला साखळी धरणातील चारही धरणे १०० टक्के भरले आहेत. त्यामध्ये २९ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे. पानशेत, वरसगाव तसेच टेमघर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. हा सर्व विसर्ग खडकवासला धरणात जमा होत आहे. त्यामुळे या धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ताम्हीणी, लोणावळा, खंडाळा घाट माथ्यावर गुरुवारी जोरदार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. ओडीशा, पश्चिम बंगालनंतर विदर्भाच्या दिशेने वारे येत आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.