बारामती (पुणे) - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात तांबड्या मक्याची ९५० क्विंटलची विक्रमी आवक झाली. मक्याला जास्तीत-जास्त १४९० ते सरासरी १४२५ असा प्रति क्विंटल दर मिळाला. याशिवाय बाजार समितीत गूळ, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मूग आणि उडीद यांची मोठी आवक झाली. अतिवृष्टी आणि टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीतून हळूहळू शेतकरी सावरत असून दिवाळीनंतर बाजार सावरू लागला आहे.
दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा
मक्यांपाठोपाठ बाजार समितीत लोकवन गव्हाची २६७ क्विंटल तर २१८९ या गव्हाची २४५ क्विंटलची आवक झाली. लोकवन गव्हाला जास्तीतजास्त १७०० तर सरासरी १५९० रुपये क्विंटल दर मिळाला. २१८९ गव्हाला जास्तीतजास्त १९०० तर सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गरडा हरभऱ्याची २० क्विंटल आवक झाली. यासाठी जास्तीत-जास्त ४२५० तर सरासरी ४१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जाडा हरभऱ्याची २० क्विंटल आवक झाली, यासाठी जास्तीत-जास्त ५ हजार ८५१ तर सरासरी ४४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बॉक्समधील गुळाला जास्तीत-जास्त ३८५० रुपये तर सरासरी ३३५० रुपये दर मिळाला. गेल्या महिन्यात कमी झालेले गुळाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महिको बाजरीची १४३ आणि हायब्रीडची २१५ क्विंटल आवक झाली. बाजरीला १९०० ते १५५० रुपये दर मिळाला.
वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांना फायदेशीर
बारामती तालुक्यातील शेतकरी शेतात विविध प्रयोग राबवत आहेत. यामध्ये मूग, उडीद, तूर तसेच अन्य उत्पन्न घेत आहेत. बाजार समितीत तुरीची ६६ क्विंटल आवक झाली. तुरीला जास्तीत-जास्त ४९२६ तर ४८०० रुपये दर मिळाला. उडदासाठी जास्तीत-जास्त ५ हजार ४०० तर सरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कोरोनामुळे बाजार समितीतील बंद असलेले व्यवहार आता हळूहळू पूर्वपदावर येत असून बाजार समितीत विविध धान्यांची विक्रमी आवक होत आहे. वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांना फायदेशीर ठरत आहे. पुढील महिन्यात धान्याची आवक वाढेल, असा अंदाज आहे.
जळोची उपबाजारात लिंबूची २२ क्विंटल आवक
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात लिंबूची २२ क्विंटल आवक झाली. लिंबाला सरासरी २ हजार तर जास्तीतजास्त ३ हजार रुपये दर मिळाला. याच बरोबर उपबाजारात वांगी, गवार, मटार, मिरची, टोमॅटो, बटाटा, भोपळा, कोबी, प्लॉवर, कोथींबीर या भाज्यांची आवक झाली.