पुणे - मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत महत्वपूर्ण निर्णय घेत कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सोमवारी संसदेत मांडला. या प्रस्तावावर विविध क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कुठे याचे स्वागत केले जात आहे तर कुठे याबाबत विरोध दर्शविला जात आहे. याबाबत निवृत्त ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जम्मू काश्मीरबाबत कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. परंतु हा प्रस्ताव पास होण्याची एक लांब प्रक्रिया असून त्यावर संसदेत चर्चा होईल. मतदानही केले जाईल आणि त्यात ते पास झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठविले जाईल आणि त्यांच्या सही नंतर हा प्रस्ताव कायदास्वरुप प्रस्तावित होईल असे ते म्हणले. तर, ही लोकशाहीची प्रक्रिया असल्यामुळे ही प्रक्रिया नक्कीच पूर्ण होईल,अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
तर, कलम ३७० काढल्यामुळे देशात आणि लेह-लदाखमध्ये याचे स्वागत होत आहे. तसेच कलम ३७० आणि ३५-अ मुळे सर्वात जास्त नुकसान काश्मीरच्या लोकांचे झाले आहे. पण, आता या कलमा हटविल्यामुळे त्यांना फायदाच होईल. तसेच येणाऱ्या दिवसांत काश्मीर खोऱ्यामध्ये एक माहिती युद्ध सुरु करुन कलम ३७०, ३५-अ हटविल्यामुळे होणाऱ्या फायद्याबाबत तेथील स्थानिकांना जागरुक करायला हवे जेणेकरुन काश्मीर खोऱ्यात पसरणारी अस्वस्थता कमी होईल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.