पुणे - विकृत मानसिकता ही सर्वात मोठी अडचण आहे. या विकृत मानसिकतेला लगाम घालणं फार महत्त्वाचे आहे. ती समाजाला लागलेली एक कीड आहे, समाजाला पोखरत आहे, त्रास देत आहे, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी बुधवारी पिंपळे सौदागर येथील अडीच वर्षीय मृत चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
मंगळवारी पहाटे अडीच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. त्यानंतर सर्व स्तरातून तीव्र आणि तितक्याच संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विजय रहाटकर म्हणाल्या, पिंपळे सौदागर येथील घटना संतापजनक आहे. अडीच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झालेल्या घटनेची दखल महिला राज्य आयोगाने घेतली आहे. आरोपी लवकरच सापडतील अशा प्रकारचा तपास पोलिसांचा सुरू असल्याचे रहाटकर म्हणाल्या.
विकृत मानसिकता सर्वात मोठी अडचण असून तिला लगाम घालणे महत्त्वाचे आहे. ती समाजाला लागलेली कीड आहे. समाजाला पोखरत आहे, त्रास देत आहे. त्यामुळे कोणाला एकाला दोष देणे, योग्य होणार नाही. आपला समाज आपण सावरायला हवा. नागरिकांना चांगल्या अर्थाने चांगले वागण्याचे नैतिक दबाव असले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. यंत्रणेने देखील काम केले पाहिजे पण प्रत्येक वेळी आपण यंत्रणेला दोष देऊन मोकळे होतो. पण समाजामध्ये नैतिक अवपतन होत आहे हे थांबविण्याचे काम सगळ्यांचे आहे.
बाल लैंगिक कायदा हा अत्यंत कठोर आहे. या कायद्यात दोन वेळा संशोधन झालेले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत आहेत. त्या व्यक्तीला फाशीचे प्रावधान कायद्यात केलेले आहे. कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान, या कायद्यात पोर्नोग्राफी समाविष्ट झालेली नव्हती, आता त्याचा बाललैंगिक अत्याचारामध्ये अंतर्भाव केलाय.