पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात एका उद्घाटन कार्यक्रमात आलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हे आज रागवल्याचे पाहायला मिळाले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत असताना अचानक एका तरूणाने हलगी वाजवायला सुरूवात केली. यावेळी चिडलेल्या आठवलेंनी या तरूणाला कॅमेरासमोर अश्लील शिवी दिली.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना तरुणाने हलगी वाजवली आणि आठवलेंना राग आला
'पिंपरी-चिंचवड शहर दर्शन' या विशेष बसचे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे हलगी वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. या बसचे उदघाटन करून आठवले दुसरीकडे जात होते. तेव्हा काही प्रसार माध्यमांच्या पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी थांबविले. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर आठवले बोलत असतानाच एका तरुणाने अचानक हलगी वाजवण्यास सुरूवात केली. तेव्हा शांत स्वभावाचे आठवले हे अचानक चिडले. रागाच्या भरात त्यांनी त्या तरुणाला अश्लील शिवी देखील दिली. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.