पुणे - मातंग समाजाच्या भावना जर दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. ज्या तरुणांनी सोशल मीडियामध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून जी वक्तव्ये केली त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते मागे घेण्याकरता प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
तीन ऑगस्टला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पिपंरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेचा उल्लेख केला होता. पण, त्याचा विपर्यास काही तरुणांनी सोशल मिडीयावर करून त्याबाबत अपप्रचार केला. या संपुर्ण प्रकाराबाबत रामदास आठवले यांनी समस्त मातंग समाजातील नेत्याची बैठक घेतली होती.
ज्या 14 तरुणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते लवकरच मुख्यंमत्र्याशी चर्चा करून मागे घेतले जातील. तसेच काही दिवसात बौध्द, मातंग समाजाचा एकत्रित मेळावा घेतला जाणार असून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.