पुणे - काही दिवसांपूर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे ऑनलाईन भूमिपूजन करावं अशी मागणीही करण्यात आली होती. पण मीच त्याला विरोध केला आणि प्रत्यक्ष भूमिपूजन करावं अशी मागणी केली होती. मोदींनी या विनंतीला मान देत येण्याचे कबूल केले होते. त्यानुसार 5 ऑगस्टला राम मंदिर भूमिपूरजन सोहळा पार पडणार असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्थ आचार्य किशोरजी व्यास यांनी दिली.
भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी 500 वर्षांपासून संघर्ष सुरू होता, तो आता पूर्णत्वास जात आहे. कोरोनाचे संकट आले नसते तर मंदिराचे कामकाज पुढे गेले असते असेही ते म्हणाले. देशात सध्या कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे नरेंद्र मोदींनी जाहीर कार्यक्रमात जाणे किती योग्य असा प्रश्न विचारला जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, काही कामांसाठी प्रत्यक्षात जावंच लागतं. बंगालमध्ये चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये मोदी तिथे जाऊ शकतात तर इथे यायला काय हरकत आहे असे मी सांगितले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यायला तयार झाले. कोरोनाच्या या परिस्थितीत देशातील लोकांचे मनोबल वाढलं पाहिजे आणि मंदिराच्या या भूमीपूजनाच्या कार्यक्रमामुळे देशातील लोकांचं मनोबल नक्कीच वाढेल असेही आचार्य किशोरजी व्यास म्हणाले.
राम मंदिराचा मुद्दा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे. कोरोनाच्या या कठीण काळात लोकांना मानसिक उभारी देण्याचं काम मंदिराचा हा मुद्दा करू शकतो. अयोध्येत उत्सव होत असताना सर्वच जण प्रत्यक्षात तिथे जाऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्या नागरीकांनी आपल्या घरात, गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून उत्सव साजरा करावा असेही ते म्हणाले.
मंदिराच्या कामासाठी तीन ते साडेतीन वर्षाचा कालावधी लागेल. देशातील प्रत्येक प्रांतातील नागरिकांना आपलंसं वाटलं पाहिजे अशी या मंदिराची रचना असेल. मंदीराची उंची 161 फूट आणि मंदिर 2 मजली असेल. संसदभवन ज्याप्रमाणे एका उंचवट्यावर आहे त्याप्रमाणेच 161 फुटावर मंदिराचे बांधकाम असणार आहे. या मंदिराचे बांधकाम गुजरातमधील सोमपुरा करणार आहेत.