बारामती (पुणे) - भाऊ-बहीणीतील प्रेम, आदर व हक्काच्या पवित्र नात्याला रेशमी धाग्याने विणण्याचा आणि भावाने बहिणीच्या संरक्षणाचे वचन देण्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. असाच भाऊ-बहीणीतील प्रेम व आदर 104 वर्षाच्या बहिणीने आपल्या 102 वर्षाच्या धाकट्या भावाला राखी बांधून व्यक्त केला आहे. याचा प्रत्यय पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथे अनुभवायला मिळाला.
आपल्या लाडाची बहीण लग्न होऊन सासरी गेल्यावर प्रत्येक भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी तिची वाट पाहत असतो. तेवढ्याच आतुरतेने आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी ती धावत माहेरी येत असते. याचा प्रत्यय रविवारी (दि. 22 ऑगस्ट) सटलवाडी येथे पहायला मिळाला. आयुष्याचे शतक पार केलेल्या म्हणजेच 104 वर्षांच्या अनुसया ज्ञानोबा गायकवाड या बहिणीने आपल्या 102 वर्षांच्या गजानन गणपत कदम या धाकट्या भावाला राखी बांधली. यावेळी या दोघा बहीण-भावांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हे क्षण पाहून नातवंडांनाही आनंद झाला. हा क्षण अनुभवण्यासाठी नातेवाईकांसह गावातील नागरिक आवर्जून उपस्थित होते.
अनुसया आजी आता 104 वर्षाच्या झाल्या आहेत. वयामुळे त्यांना आता स्वतः दौंड तालुक्यातील कासुर्डी येथून सटलवाडीत आपल्या माहेरी येणे शक्य नाही. पण, त्यांची नातवंडे किंवा परतुंडे त्यांना रक्षा बंधनासाठी आवर्जून घेऊन येतात. अनुसया आजींना 9 मुली, 2 मुले, 37 नातू, 45 परतुंडे, 12 खापर परतुंडे तर त्यांच्या बंधूंना म्हणजेच गजानन आजोबांना 2 मुले, 6 मुली, 23 नातू, 25 परतुंडे, असा त्यांना भला मोठा गोतावळा आहे.
हेही वाचा - बैलगाडा मालकांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेणार -दिलीप वळसे पाटील