पुणे - विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपला आम आदमी पक्षाने लोकांचे प्रश्न सोडवून उत्तर दिले. आपचा विजय हा भाजपाच्या आक्रस्ताळ आणि हिडीस राजकारणावरचा विजय आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, भाजपने दांभिक राष्ट्रवादाची परिसीमा गाठली होती. त्यात देशात आर्थीक मंदी, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करताना अडचणी येत आहेत. यावरुन लक्ष हटविण्यासाठी आक्रस्ताळेपणा भाजपाने सुरु केला. विरोधी मत व्यक्त करणाऱ्याला देशद्रोही ठरवण्यात आले. यावर आम आदमी पक्षाने शांतपणे नागरिकांचे प्रश्न सोडवत भाजपला चांगले उत्तर दिले. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या त्याचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा देणारा प्रशासक मिळाला तर ते जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करतात हे दिल्लीच्या मतदारांनी दाखवून दिले.
आप आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष येऊ शकतात एकत्र
आम आदमी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे नैसर्गिक मित्र आहेत. केजरीवाल यांना 2013ला मी सांगलीला घेऊन आलो होतो. आम आदमी पक्षाची ग्रामीण भागाची भूमिका स्पष्ट झाली नव्हती म्हणून आम्ही थांबलो होतो, पण, येत्या काळात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळता येत नाही, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
हेही वाचा - 'हा तर सत्य आणि विकासाचा विजय'