बारामती - नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी ऊस हे आळशी लोकांचे पीक आहे. त्याला जास्त मेहनत करावी लागत नाही. असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, उसाला ही प्रचंड मेहनत घ्यावी लागते. मी स्वतः एक ऊस उत्पादक शेतकरी आहे. उलट याबाबत पवारांनाच माझा सवाल आहे की, आपण दहा वर्ष कृषीमंत्री होता. उसाकडे शेतकरी का वळतो तर इतर पिकांपेक्षा उसाला कमी पैसा मिळतो. पण, शाश्वत मिळतो. ऊसाला हमीभावाची गॅरंटी आहे. मात्र, सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर, बाजरी आदी पिकांना तसा हमी भाव मिळत नाही. ज्यावेळी कायद्याने अशा पिकांना हमीभाव मिळेल तेव्हा ऊस उत्पादक शेतकरी इतर पिकांकडे वळतील. हेच काम पवारांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात केले असते तर आज ऊस उत्पादकांच्या संख्येत वाढ झाली नसती, असे म्हणत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
विविध मागण्यांसाठी बळीराजा 'हुंकार यात्रा' - केंद्र सरकारच्या धोरणामुळे रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो आहे. तसेच सध्याच्या राज्य सरकारने भूमिअधिग्रहण कायद्यात बदल केल्याने शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला कमी झाला आहे. केंद्रातील कृषी विषयक कायदे मागे घेण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. शेती मालाला हमी भाव मिळत नाही. अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी बळीराजा 'हुंकार यात्रा' सुरू केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात मात्र तुटपुंजी भरपाई दिली - नैसर्गिक घटकाचे समान वाटप व्हायला पाहिजे. मात्र, विजेच्या बाबतीत पक्षपात होत आहे. शेतकरी वगळता इतर घटकांना 24 तास विजेचा पुरवठा केला जातो. मात्र, शेतकऱ्यांना आठ तास ते ही खंडित करून रात्री-अपरात्री विजेचा पुरवठा केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. सर्पदंश, जंगली जनावरांचे हल्ले व महावितरणाच्या तुटलेल्या तारांचा करंट लागून अनेक शेतकऱ्यांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे. तसेच अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 पेक्षा अधिक भरपाई देऊ, असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात मात्र तुटपुंजी भरपाई दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे शेट्टी म्हणाले.
...राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देणार - दोन वर्षाच्या खंडानंतर 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हमी भावाचा कायदा मंजूर करावा व शेतकऱ्याला दहा तास वीज मिळावी, असे दोन ठराव करून घ्यावेत असे आव्हान शेट्टी यांनी केले आहे. हमीभावाच्या कायद्यासंदर्भात शेट्टी म्हणाले की, देशभरातील शेतकऱ्यांकडून हा ठराव एकत्रित करून ते राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देणार आहोत.
हेही वाचा - Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा अडचणीत.. 'या' प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी