बारामती : अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल उद्या लागणार आहे. याबाबत स्वत: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी घोषणा केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकी व मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची छायांकित प्रत देण्यास राजभवन कार्यालयाने नकार दिल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
राजीनामा दिल्याची माहिती कोठे: राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त तोंडी मुख्यमंत्री पदाचा व आमदारकीचा राजीनामा दिल्याचे ऐकिवात होते. हा राजीनामा राजभवन कार्यालयात राज्यपाल महोदयांकडे उपलब्ध आहे का? असल्यास त्याची साक्षांकित प्रत मिळावी अशी मागणी, बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली होती.
ठाकरे यांचा राजीनामा न्यायप्रविष्ठ: यादव यांना सदर माहिती बाबत राज्यपालांचे सचिवालय राजभवन कार्यालयाने सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे व राज्यपाल हेही यात पक्षकार असल्याने, याबाबत कोणतीही माहिती देता येणार नसल्याचा अजब दावा केला आहे. यामुळे नेमका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण पुढे करत आहेत. का राजभवन कार्यालयास जाणुनबूजुन माहिती उपलब्ध करायची नाही की, वास्तविक त्यांचेकडे असा कोणता राजीनामा उपलब्ध नाही, असा प्रश्न यादव यांनी उपस्थित केला आहे.
माहिती देण्यास नाकारली: याआधी मराठा आरक्षण व धनगर आरक्षणाबाबत यादव यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली होती. मात्र त्यावेळेस राज्य सरकाराने सदर बाब न्यायप्रविष्ठ असताना देखील दोन्ही प्रकरणात माहिती उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे नेमके या प्रकरणात माहिती न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण पुढे करुन, नेमके कोणाच्या दबावामुळे सदरची माहिती देण्यास नाकारली जात आहे. हा चौकशीचा भाग असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.
हेही वाचा -