पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवारांकडे नेमके किती आमदार आहेत याबाबत कोणताही अधिकृत आकडा बाहेर आलेला नाही. मात्र, दुसरीकडे अजित पवारांनी त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. जो प्रकार झाला तो अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. कोणी राज्यात जर जनमत घेतले, तर प्रत्येक घरातून शिव्या ऐकायला मिळतील. हा मतदारांचा घोर अपमान आहे. याबाबत मी एक मेळावा घेणार आहे. त्यात सविस्तर बोलणार असल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले.
तरुणीचे प्राण वाचवणाऱ्यांचा सत्कार : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयात भेट दिली. मागच्या आठवड्यात सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयता हल्ला झाला होता. मात्र, तेथील दोन तरुणांची तात्काळ तरुणीची मदत करत आरोपीच्या तावडीतून तिची सुटका केली होती. या दोन्ही तरुणांचा सत्कार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी राज्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
राष्ट्रवादीत फुट संशयास्पद : आमदार फुटीबाबत राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, या सगळ्याची सुरवात शरद पवार यांनी केली. 78 साली जे झाले ते कधी महाराष्ट्रात झाले नव्हते. याची सुरूवात शरद पवार यांनी केली. तेच आज शरद पवारांसोबत झाले. शरद पवारांनी जे पेरले तेच उगवले अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. ज्यांनी बंड केले त्यातील प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हे अजित पवारांच्या बरोबर जाणारी माणसे नाहीत. या तिघांचे सरकारमध्ये जाणे मला संशयास्पद वाटते आहे. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही असे देखील ठाकरे म्हणाले.