पुणे - कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली धोका लक्षात घेऊन फक्त विमानतळच नव्हे तर रेल्वे स्थानकांवरसुद्धा योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. पुणे रेल्वे विभाग कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.
कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी सज्ज असल्याचे झंवर यांनी म्हटले आहे. यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे रेल्वे प्रवाशांना या आजारापासून कसे दूर राहता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. आजारी प्रवाशांनी शक्यतो प्रवास करणे टाळण्याचे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आजारी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी आली तर त्याच्या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ शकतो.
हेही वाचा - दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण
दरम्यान, पुणे विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि लोणावळा या स्थानकांवर स्वच्छता ठेवण्यात आली आहे. तसेच जर एखादा रुग्ण संशयित आढळला तर राज्य सरकारशी संपर्क साधून त्याला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्थाही केल्याची माहिती झंवर यांनी दिली.