दौंड - पुणे प्रवासी संघ आणि दौंड शहरातील सर्वपक्षीयांच्या वतीने आज दौंड रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र रेल्वे प्रशासनाने दौंड प्रवासी संघाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून लवकरात लवकर सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात येतील रेल्वे रोको आंदोलन करू नये, असे लेखी दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. याबाबत दौंड शहरातील सर्वपक्षीय नेते आणि दौंड पुणे रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने माहिती देण्यात आली.
प्रवाशांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा
दौंड शहरातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे येथे जात असतात. मात्र कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे रेल्वे सेवा बंद आहे. यामुळे पुण्याला जाणाऱ्या कामगार वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे पुणे-दौंड रेल्वे सेवा सुरू करावी अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दौंड-पुणे रेल्वे संघटनेच्यावतीने देण्यात आला होता.
रेल्वेच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन रद्द
शनिवारी रात्री उशिरा दौंड रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी दौंड पुणे रेल्वे प्रवासी संघास प्रवाशांच्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करत असून, दौंड-पुणे रेल्वेच्या सर्व गाड्या लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वे रोको करू नये, असे लेखी आश्वासन देण्यात आले. यामुळे आजचे रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.